डायरी

तिचं माझ्यावरचं प्रेम एक प्रेमळ शायरी
बरच काही सांगून गेली मला तिची डायरी

आवरतांना कपाट माझ्या अलगद लागली हाती
प्रत्येक पान पुन्हा एकदा जगवून गेलं नाती

सुंदर कोरीव अक्षरांनी भरली होती पानं
शब्दात शब्द गंफून तिने मांडलं होत गाणं

वाचता एक एक पान हरपलं माझं भान
उभी होती येऊन मागे आलच नाही ध्यान

हरुच ठेऊन खांद्यावर हात पुटपुटली कानात
अरे वेड्या मी नसतांना हीच येईल कामात

गुलमोहर

अंगणातला गुलमोहर पाहता पाहता सुकाला
तुझा त्याला भेटण्याचा नियम जसा तुटला

तू गेलिस त्या दिवशी तो बहरला होता वेडा
तुझा पार्थीवावर त्याचाच घातला होता सडा

माहीत होता मला खूप आवडतो तो तुला
म्हणूनच जातानाही दिला तुझ्या सोबतीला

तू गेल्याचे कसे कळले त्याला समजत नाही
पण त्यावर आता एकही फूल उमलत नाही

एकदा वाटलं मुळासकट फेकून द्यावा उपटून
पण तोच तर करून देतो आठवण तुझी हटकून..

निरोप

गेले काही दिवस मी एक नियम पाळतो आहे
तिच्या घराकडे जाण्याचे टाळतो आहे

कारण तिला बघित्तल की जुने दिवस आठवतात
पुन्हा पुन्हा तिच्या घरा कडे पाठवतात

काही दिवसान पूर्वीच तिने निरोप दिलाय मला
म्हणाली होती आता अशी भेटणार नाही तुला

घरच्यांनी आपल ठरवला आहे लग्न
चांगलं दिसत नाही आपल अस वागणं

तुझ्या माझ्या लग्नाला दिवस उरलेत कमी
लवकरच तू माझा होणार आहेस धनी

आठवण

का सांजवेळी आज होती तुझेच भास
आवळती मनाला का आठवणींचे फास

बाहेर अंगणात बरसून गेला मेघ
हलकेच गालावरती ओघळली पहा रेघ

हे घर झाले मूक ना बोले बघ काही
जगणे माझे उदासिन ते मूकपणे पाही

गेलिस एकट्याला तु सोडुन का ग येथे
सोबतिला तुझ्याही कोणी नको का तेथे..