रस्त्यावरचा वेडा

तो रोज मला दिसतो वेडसर चाळे करतांना
इकडून तिकडे रस्त्यावर वेडा वाकडा फिरतांना
कधी करतो हात वारे कधी स्वतशी बडबड
डोळे रूक्ष पाहता वाढे हृदयाची हो धडधड

वाढलेले केस फाटके कपडे आणी रंग काळा
येता जाता त्यास चिडवणे हाच लोकांना चाळा
पण त्याला चिडवलं की तो अगदी शांत बसतो
किती वेडा आहात तुम्ही अविर्भावात या हसतो

उरलं सुरलं घरा घरातल मिळत त्याला खायला
फुटकी बाटली असतेच जवळ थोड पाणी प्यायला
सोबत असते नेहमीच त्याच्या एक छोटे गाठोडे
येता जाता बघतोय त्याला गेले कित्येक आठवडे

रात्री येऊन पोलीस वाले मजा त्याची घेतात
उचलून त्याचे सामान दूर फेकून देतात
ते गेल्यावर मग तो बडबड करतो थोडा
जीवन असेच जगतो तो रस्त्यावरचा वेडा

No comments: