पुतळा

गेली कित्येक वर्ष मी असाच ईथे आहे उभा
चालण्या फिरण्याची थोडी नाही मला मुभा

सारं काही मी माझ्या डोळ्यांनी या बघतो
ऊन पाउस वारा थंडी सारं काही सोसतो

सकाळी येऊन बसतात अंगावर माझ्या पक्षी
कपड्यांनवर ते माझ्या करून जातात नक्षी

आजुबाजुला माझ्या लावली आहेत झाडं त्यानी
एक म्हातारा रोज सकाळी त्यांना टाकतो पाणी

दिवस चढता दिसू लागतात माणसांचे लोंढे
सहन करतो दिवसभर मग गाड्यांचे मी भोंगे

भर उन्हात भाजुन निघते रोज माझी काया
डोक्यावरती छतरी बांधून देईल कोणी छाया

होते संध्याकाळ अजुन दिवस एक सरतो
आजु बाजुला माझ्या ठेल्यांचा मेळावा भरतो

एक वेडा रात्री रोज सोबतीला असतो माझ्या
झोपतो पायाशी फाटक्या चादरीवर त्याच्या

ओळख माझी मला ना माहीत इथे कुणा
मी आहे पार्क समोरचा पुतळा एक जुना

No comments: